कोरोनाची माझी भेट 

15 Aug 2020

मी डॉ. अकल्पिता परांजपे. 
माझ्याकडे करोना आला, हळुवार पावलांनी. भेट देऊन गेला. आला ते पण नकळत. गेला ते पण नकळत. 

माझा हा सगळं सांगण्याचा प्रपंच अश्यासाठी कि सध्या अनेक कारणांमुळे लोकांनी करोनाची धास्ती घेतली आहे. परंतु आपण काळजी घेतली तर हा विषाणू आपल्याला फार त्रास न देता जाऊ शकतो हे लक्षात घ्या. लोकजागृती हा ह्यामागचा उद्देश आहे. आणि या संकटातून कसा मार्ग काढायचा त्याबद्दल काही सूचना आहेत. अनेक दिवसांपासून मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सुसज्ज राहा पण भीतीच्या छायेत वावरू नका. आपल्याला जर सामोरे जावे लागले तर कसे बाहेर पडायचे याचा विचार करा. 

आता खाली मी माझा स्वतःचा अनुभव विशद करणार आहे.. 

प्रातिक्षा संपली, परिक्षा   झाली, निर्णय हाती आला, तेंव्हा आता ही गोष्ट सांगते, ऐका!

lockdown च्या काळात मला भेटायला बरेच लोक येत राहिले. कोणाला करोना झाला होता, नव्हता कळायला मार्ग नाही. पण त्यामुळे मला संसर्ग कधीही होऊ शकतो ह्याची कल्पना होती. भीती नव्हती, कारण माझी रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ह्याची खात्री होतीच. 

 तो आला. मला नकळत. तो गेला. मला नकळत. 

आणि तो येऊन गेल्याची जाणीव अचानक झाली. झालं असं कि दि. २५ जुलै रोजी माझी एक मैत्रीण बरोबर एक पाव्हणे घेऊन आली. त्यांना माझी गोशाळा बघायची होती. तिथे गाई मोकळ्या फिरतात, त्यांना हवं ते, हवं तेंव्हा खातात. हवं तेंव्हा पाणी पितात आणि मर्जी प्रमाणे विश्रांती घेतात. हि जागा माझ्या गावातील घरापासून साधारण १ ते २ किलोमीटर असेल. मी पाव्हण्यांबरोबर चालत गेले. तशी नेहेमीच जाते. कधी दोनदा सुद्धा.  अगदी कडक उन्हाळ्यातही.   
पण २५  जुलैला मला चालताना दम लागत होता. मला दोन तीन वेळा विश्रांती घ्यावी लागली. गाईंच्या बरोबर हिंडतानापण श्वास घ्यायला थांबून थांबून चालावं लागल. मला जरा संकोचल्यासारखं झाल.. पण पाव्हणे म्हणाले, या वयात (वय वर्ष ७२) तुम्ही किती चालता! 
आणि परत येताना मात्र मला चक्क दहा ते पंधरा मिनिट झाडाखाली बसून विश्रांती घ्यावी लागली. कारण श्वास लागत होता.   
माझा स्टॅमिना चांगला आहे. मी दिवसभर सुद्धा उन्हातान्हात काम करू शकते. ही मी नव्हेच. काहीतरी गडबड आहे. 
झाल अस कि २४ जुलैला माझी डेंटल इम्प्लान्टची सर्जरी झाली होती. दोन दिवस चहा कॉफीवर होते. त्यामुळे झाल असेल असं मी मनाच समाधान करून घेतलं. बाकी रोज घरातल्या घरात मला काही त्रास नव्हता. शिवाय लॉक डाऊन मुळे फिरण्याचा सराव  पण राहिला नव्हता.
ऑक्सिमीटर घरात येऊन पडलं होत. पण कधी बाहेर काढलं नव्हतं. ते काढलं.  उजवीकडे SpO२ ९२, डावीकडे नॉर्मल.   
त्यादिवशी मध्यरात्री मला एकदम जाग आली. श्वास घ्यायला उठून बसावं लागल . हम्म. काहीतरी नक्कीच बिघडल आहे. 
सकाळी उठून भावाला फोन केला. तो पॅथालॉजिस्ट आहे. एका डॉक्टर मैत्रिणिलापण फोन केला. माझ्या भावाच्या सल्ल्यानुसार माझ्या व माझ्या यजमानांच्या पॅथॉलॉजिकल टेस्ट्स केल्या.  माझे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल. यजमानांचे थोडे वेगळे. पण ती कथा आपण नंतर ऐकुया. 
हे काय गौडबंगाल आहे कळेना. मग मी माझी व माझ्या यजमानांची कोविद १९ ची अँटीबॉडी टेस्ट करवली. रिपोर्ट्स हातात आले आणि मी खुश! माझ्या रिपोर्टवर रेड मार्क होता. रेंज ० ते १, माझ  रिडींग १.१९. अहा! मला करोना होऊन गेला आहे. मी आता मुक्त झाले. मला करोना  होणार नाही, माझ्याकडून कुणाला जाणार  नाही! माझी करोनाशी  लढण्याची रोगप्रतिकार शक्ती जागृत झाली  आहे. 
पण अजून एक यक्ष प्रश्न पुढे आला. श्रीनिवास, माझे यजमान, त्यांच्या अँटीबॉडीज  ०.०५! एकाच घरात दिवसभर एकत्र राहणार, बरोबर जेवणार खाणार, आणि त्यांच्या सिस्टिमने अजून अँटीबॉडीज तयार केल्या नाहीत? हे निराशाजनक आहे. पण मग आणखीन काही टेस्ट्स केल्यात आणि या निर्णयाप्रत आलो की त्यांनापण संसर्ग झाला असणार पण अजून अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत. 
२५ जुलैपासून आम्ही घराबाहेर पडलो नव्हतो. मग आम्ही "विलगीकरण" ६  ऑगस्ट पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. ६ ऑगस्टला कोविद १९ ची swab टेस्ट करून घेतली. ७ ऑगस्टला त्याचे निर्णय मिळाले. दोघांची टेस्ट निगेटिव्ह होती. आमचं स्वयंनिर्बंधित "विलगीकरण" संपल.  

निष्कर्ष काय? तर मला कोविद १९ चा संसर्ग झाला होता. माझ्या शरीर यंत्रणेने त्याचे प्रतिजीव तयार केले होते. 

या सर्व प्रकारात मी कोणतीही कोरोना करता म्हणून औषध घेतली नाहीत. त्याची दोन कारण आहेत. एक म्हणजे मला संसर्ग झाला आहे याबाबत मी अनभिज्ञ होते, त्यामुळे त्यावर काही औषधोपचार घेण्याचा प्रश्न नव्हता. (जरी मला कल्पना होती कि मला संसर्ग होऊ शकतो. कारण मी संशयास्पद अश्या बऱ्याच व्यक्तींना भेटले होते.)
शिवाय मला हे माहित होत कि ह्या रोगाशी सामना करणं हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच काम आहे. औषध फक्त मदत करू शकतात. त्यांचा या विषाणूंवर काही परिणाम होत नाही.
आता दुसरा यक्ष प्रश्न. कोरोना गेला. मग आता श्वास घ्यायला त्रास का? 
आपण याच उत्तर दोन दिशांनी शोधू शकतो. विज्ञान काय सांगत? हा विषाणू आपल्या शरीराच्या पेशींमध्ये शिरतो. आणि पेशी स्वतःच द्विभाजन करायला जी यंत्रणा वापरतात, त्याच यंत्रणेचा वापर करून स्वतःच्या मोठ्या प्रमाणात प्रतिछबि तयार करतो. अगदी आपल्या कवचाला लागणाऱ्या प्रथिनांना सुद्धा तयार करवतो. आणि मग हि प्रथिने स्वयंसिद्ध अनुभूतीने या विषाणूचे कवच तयार करतात. अश्या खूप प्रति निर्माण झाल्या, की आपल्या पेशींच्या कवचाला तो भार सहन होत नाही व ते कवच फुटते. मग दोन गोष्टी घडतात. एक, आपल्या पेशीचा मृत्यू होतो. आणि तिचे विघटित तुकडे जिथे हि घटना घडते तिथे पडून राहतात. 
हे युद्ध जर आपल्या फुफुसांमध्ये झाल असेल, तर धारातीर्थी पडलेल्या पेशीचे शव तिथेच पडले राहते. अश्या अनेक पेशींचा मृत्यू झाला, कि तिथे अश्या कचऱ्याचा ढीग निर्माण होतो. आणि मग आपल्या रोगप्रतिकाररक शक्तींनी जरी या विषाणूंवर मात केली तरी हा कचऱ्याचा ढीग तिथेच पडला राहतो. 
ही जर आपली लाल रक्तपेशी असेल, तर तिच्या विघटनामुळे त्यातील लोह कण विलग होतो आणि तो प्राणवायूचे वाहन करण्याच्या कामी येत नाही. त्यामुळे प्राणवायूची कमतरता जाणवायला लागते. भरीस भर म्हणजे विघटनातून उरलेल्या शवांचा ढीग आपली फुफ्फुसेपण  मोकळी ठेवत नाही.  त्यामुळे विषाणू गेला तरी जोपर्यंत हा ढीग उपसला जात नाही तोपर्यंत श्वासोश्वासाला त्रास होतो. 

आता पुढचा प्रश्न. मग हि पडलेली घाण कशी साफ करायची. याच उत्तर आपण नंतर शोधूया. 

सध्या जो महत्वाचा प्रश्न भेडसावतो आहे तो म्हणजे या फुफुसांच्या निष्क्रियतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची. लक्षात घ्या, ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो, त्यांच्याकडे असे कोणतेच औषध उपलब्ध नाही. हे काम आयुर्वेदाची किंवा होमियोपॅथीची औषधे लीलया करू शकतात. 
अश्यावेळी प्राणवायू देणे हे जीवितहानी वाचवू शकते. पण त्यानी जर फायदा झाला नाही तर रोग्याला अतिदक्षता विभागात हलवले जाते आणि तिथे कृत्रिमरीत्या फुफुसात प्राणवायू सोडला जातो. (vantilator). ही क्रिया तेथे साचलेले पेशींचे अवशेष तर काढू शकत नाही, पण त्या अवशेषांवर नको तो दाब मात्र वाढवू शकते. 

 त्यामुळे मी आपणा सर्वांना विनंती करते. जागते रहो. या सर्व आजारपणात काय आणि कोणती औषधे किंवा यंत्रणा वापरायची याच भान ठेवा. रोगाच्या शेवटी रोग बरा झाला पण रोगी मेला अशी स्थिती निर्माण होत आहे. कारण हे पेशींचे अवशेष फुफुसातून रक्तप्रवाहाकडे जाणाऱ्या प्राणवायूला अडथळा आणतात.
 
एक आणखीन बाब लक्षात घ्यावी. निसर्ग जाणकार आहे. असे पेशींचे अवशेष बाहेर काढण्याकरता (खाऊन संपवण्या करता) तिथे जिवाणूंची फौज जाते. त्याला डॉक्टर्स "इन्फेकशन" म्हणतात. आणि त्यांना मारायला प्रतिजैविक (अँटिबायोटिक्स) देतात. मग हि फौज मरते, पण तिथली घाण तिथेच रहाते. मग आणखीन प्रतिजैविके. मग परत जिवाणूंची फौज खाद्य संपावायला. आणि मग हे जिवाणू प्रतिजैविकांना दाद देत नाहीत ( एन्टीबायोटिक रेजिस्टंट बॅक्टरीया). 
त्यामुळे डॉक्टर आणि रोगी, दोघेही औषध देताना किंवा घेताना सावध रहा. 

आपला देश भाग्यशाली आहे. आपल्याला हजारो वर्षाची आयुर्वेदाची आणि शेकडो वर्षांची होमिओपॅथीची परंपरा आहे. आपल्याकडे ऍलोपॅथीच्या डॉक्टरांचा मोठा ताफा उपलब्ध आहे. या यंत्रणेचा जर आपण उपयोग करून घेतला तर या विषाणूंवर आपण लवकरच मात करू शकतो, जर आपण कोविदची  टेस्ट करून घ्या, कोविद हॉस्पिटल मध्ये भरती व्हा, विलगीकरण करा, आणि अगणित lokdown चा सामना करा या चक्रव्यूहात आपला अभिमन्यू करून न घेता गोपाळ कृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्याचा भेद करून बाहेर पडलो तर. 
या चक्रव्यूहाचा भेद करायला शिका. आपला अभिमन्यू होऊ देऊ नका. 

ही पोस्ट आपल्या सर्वांच्या मनातील भीती दूर करण्या करीता लिहिली आहे. ती वाचा, त्याची प्रत करा, ती आपल्या आप्तांना कळवा, आणि लोकजागृतीच्या या यज्ञात सहभागी व्हा. 

मी परत एकदा कळकळीची विनंती करते. काही शंका आली तर आधी तुमच्या जवळच्या होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा. किंवा तुमच्या नेहेमीच्या कौटुंबिक डॉक्टरला भेटा. तुम्हाला कोविद झाला आहे किंवा नाही हे जाणून घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच मानसिक, शारीरिक आणि आर्थिक स्वास्थ्य महत्वाचं आहे. ते टिकवून ठेवा.
 
आम्हाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही मार्गदर्शना करीता कधीही फोन करू शकता.आपल्याजवळ असलेल्या उपचार डॉक्टरशी आपला सम्पर्क करून दिला जाईल. एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर तस आम्हाला कळवा. आपल नाव, पत्ता, फोन क्रमांक द्या. आणि या देशहिताच्या कार्यक्रमात सहभागी व्हा.